दूरदर्शन, आकाशवाणीवरील जुने कार्यक्रम आता ’ओटीटी’वर   

पुणे : एकेकाळी माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम म्हणून आकाशवाणीची ओळख होती. आजपर्यंत आकाशवाणी आणि दूरदर्शनवर गाजलेल्या कार्यक्रमांचा खजिना रसिकांसाठी पुन्हा एकदा वेव्हज ओटीटी व्यासपीठावर उपलब्ध झाला आहे. प्रसार भारतीने वेव्हज हे ओटीटी अ‍ॅप तयार केला आहे. त्यावर जुन्या मालिका, चित्रपट, आकाशवाणीवरील रेकॉर्डेड सांगितिक कार्यक्रम, माहितीपट रसिकांना पाहता व ऐकता येणार आहेत. 
 
आतापर्यंत १० लाख हून अधिक लोकांनी ओटीटी अ‍ॅपला पसंती दिली आहे. विशेष म्हणजे नोस्टॅल्जिक या विभागात दूरदर्शनच्या रामायण, महाभारत, शक्तिमान यासारख्या गाजलेल्या मालिकांही पाहायला मिळत आहेत. हा ओटीटी अ‍ॅपवर सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. शुक्रवारी प्रसार भारतीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आकाशवाणी पुणे विभागाचे उपमहानिदेशक (अभियांत्रिकी) अधीर गडपाले यांनी याबाबत माहिती दिली. आकाशवाणी पुणेच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये यावेळी उपस्थित होते.
 
गडपाले म्हणाले, प्रसार भारतीनेही डिजिटल व्यासपीठाचा वापर सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून २० नोव्हेंबर २०२४ मध्ये वेव्हज या ओटीटी व्यासपीठास सुरुवात झाली. यात आकाशवाणी केंद्रातील रेकॉर्डेड कार्यक्रम श्रोत्यांसाठी उपलब्ध आहेत. हे ऍप सुमारे १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. माहिती, मनोरंजन, बातम्या, संस्कृती, पौराणिक कथा, भक्तिगीते, रिऍलिटी शो, इतिहास, शिक्षण,लोककथा, क्रीडा आदींसंबंधीची माहिती ऍपवर उपलब्ध आहेत.

जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचे (वेव्ज) आयोजन केले आहे. ही परिषद मुंबई येथे १ ते ४ मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (बीकेसी) येथे होणार आहे. जागतिक मीडिया आणि मनोरंजन उद्योगात भारताची स्थिती उंचावणे हा या परिषदेचा उद्देश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच प्रसार भारती यांच्यासह फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचा (फिक्की) आयोजनात सहभाग आहे. या परिषदेसाठी पाच हजार हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहितीही अधीर गडपाले यांनी दिली.
 

Related Articles